पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाने (नवाझ शरीफ गट) पंतप्रधान पदासाठी नवाझ शरीफ यांच्या नावाची घोषणा केली. ५ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब होईल. पंतप्रधान पदासाठी शरीफ यांच्या नावावर पक्षात एकमत झाले असून ५ जून रोजी या पदासाठी होणारी निवडणूक हा केवळ औपचारिकतेचा भाग उरला आहे. ५ जूनच्या निवडणुकीनंतर शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील व त्यामुळे पाकिस्तानच्या इतिहासात अभूतपूर्व अशी घटना म्हणून याची नोंद होईल.
राष्ट्रीय असेंब्लीतर्फे पाकिस्तानच्या पंतप्रधान पदासाठी ५ जून रोजी निवडणूक होईल, असे सोमवारी अधिकृत सूत्रांतर्फे सांगण्यात आले. त्याअगोदर पाकिस्तान संसदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचे अधिवेशन १ जून रोजी होईल. त्याच दिवशी निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी होणार आहे.
पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाच्या नवाझ शरीफ गटाने ६३ वर्षीय नवाझ शरीफ यांचे पंतप्रधान पदासाठी पक्षातर्फे नाव घोषित केले. राष्ट्रीय असेंब्लीत यासाठी लागणारे ३४२ मतांचे आवश्यक असलेले पाठबळ पक्षाकडे आहे. त्यामुळे शरीफ यांची त्या पदावरील नियुक्ती हा केवळ औपचारिकतेचाच भाग उरला आहे.
५ जून रोजी शरीफ हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होतील. त्याअगोदर १९९०-१९९३ आणि १९९७-९९ अशा दोन वेळा शरीफ यांनी हे पद भूषविले आहे.
राष्ट्रीय असेंब्लीत सभापती आणि उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज २ जूनपर्यंत स्वीकारले जाणार असून ३ जून रोजी या पदांसाठी निवडणूक होईल. त्यानंतर ४ जूनपर्यंत पंतप्रधानपदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील व या पदासाठी ५ जून रोजी निवडणूक होईल, असे सूत्रांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.