स्विस बँकेत काळा पैसा दडवून ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मात केली आहे. पाकिस्तानातील धनिक आणि काही बडय़ा उद्योगसमूहांनी १४४१ दशलक्ष स्विस फ्रँक (९२०० कोटी रुपये) इतका काळा पैसा स्विस बँकेत दडवून ठेवला आहे.
तथापि, स्वित्र्झलडच्या मध्यवर्ती बँकेने २००२ पासून माहिती गोळा करावयास सुरुवात केली असून, उपरोक्त काळा पैसा तुलनेत सर्वात कमी असल्याचे आढळले आहे. कारण २००५ मध्ये गोळा केलेल्या माहितीनुसार, ही रक्कम तीन अब्ज स्विस फ्रँकहून अधिक होती, तर २०१० मध्ये १.९५ अब्ज स्विस फ्रँक इतकी नोंद करण्यात आली होती.
पाकिस्तानातील स्थानिक चलनानुसार तेथील धनिक आणि बडय़ा उद्योगसमूहांनी ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत १५ हजार कोटी पाकिस्तानी रुपयांचा काळा पैसा स्विस बँकेत दडवून ठेवला असल्याची माहिती उघड झाली आहे. मात्र डिसेंबर २०११ च्या तुलनेत ही रक्कम ३२ टक्क्य़ांनी कमी आहे. डिसेंबर २०११ मध्ये ही रक्कम २३ हजार कोटी पाकिस्तानी रुपये इतकी होती, असे मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
स्विस बँकेत काळा पैसा दडवून ठेवण्याच्या प्रश्नावर पाकिस्तानात जोरदार चर्चा अपेक्षित आहे, कारण स्विस बँकेतील पैसा सुरक्षित राहात असल्याने काही बडय़ा राजकीय नेत्यांनी आपला काळा पैसा स्विस बँकेत ठेवला आहे. तथापि, लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पाकिस्तान हा भारताच्या तुलनेत कितीतरी पटीने लहान असतानाही भारतापेक्षाही मोठी रक्कम स्विस बँकेत असण्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.