बृहत दक्षिण आशियायी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न

भारताच्या सार्क देशांच्या चळवळीवरील प्रभावाला तोंड देण्यासाठी पाकिस्तान आता बृहत दक्षिण आशियायी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे त्यात चीन, इराण व शेजारी देश तसेच मध्य आशियायी देशांचा समावेश केला जाणार आहे. डॉन न्यूजने राजनैतिक निरीक्षकांच्या माध्यमातून असे म्हटले आहे की, मोठी दक्षिण आशियायी आर्थिक आघाडी तयार करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे व त्यात साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कार्पोरेशन (सार्क) या आठ सदस्यांच्या संस्थेवर भारताचा असलेला प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न आहे.

पाकिस्तानचे संसदीय शिष्टमंडळ सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे, त्यांनी पाच दिवसांच्या वॉशिंग्टनमधील बैठकीत हे मत व्यक्त केले. बृहत दक्षिण आशिया लवकरच उयास येईल असे सिनेटर मुशाहिद हुसेन यांनी सांगितले. ही आघाडी चीन, इराण व शेजारी मध्य आशियायी देशांसह असेल. चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिका दक्षिण आशिया व मध्य आशिया यांना जोडणारी आहे. ग्वादर बंदर हे चीनलाच नव्हे तर इतर मध्य आशियायी देशांना जवळ आहे. भारतानेही या आघाडीत सामील व्हावे अशी आमची अपेक्षा आहे. भारत हा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता नाही कारण सार्कमधून मिळणारे फायदे भारताला पुरेसे आहेत. भारताने सार्क संघटनेत पाकिस्तानला एकटे पाडले आहे. कारण भारताने दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर १९ व्या सार्क शिखर बैठकीसाठी इस्लामाबाद येथे उपस्थित राहण्यावर बहिष्कार घातला आहे.

भारताने सीमेपलीकडील दहशतवादाच्या कारणास्तव सध्याच्या परिस्थितीत सार्क परिषदेस येता येणार नाही असे कळवले आहे. बांगलादेश, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान यांनीही शिखर बैठकीतून माघार घेतली आहे. भूतान सर्व बाजूने भारताने वेढलेला असून त्याला भारताच्या भूमिकेस विरोध करता आला नाही. मालदीव, नेपाळ व श्रीलंका यांचे पाकिस्तानशी चांगले संबंध असले तरी भारतासारखे चांगले नाही. नवीन प्रादेशिक प्रणाली स्थापन करण्याचा विचार कायम असल्याचे वरिष्ठ राजनीतीज्ञांनी सांगितले. सध्याच्या स्थितीत सार्क भारताच्या मुठीत राहणार आहे त्यामुळे बृहत दक्षिण आशिया आघाडीची चर्चा सुरू झाली आहे.