पाकिस्तानला अरबी समुद्रात तेल आणि गॅस साठयांच्या स्वरुपात लवकरच मोठा जॅकपॉट लागू शकतो. पाकिस्तान हे तेल आणि गॅस साठे शोधून काढण्याच्या जवळ पोहोचला आहे अशी माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. या तेल-गॅस साठयांमुळे पाकिस्तानची आर्थिक संकटातून सुटका होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तेलासाठी सुरु असलेले उत्खनन अंतिम टप्प्यात असून मोठा साठ हाती लागू शकतो असे इम्रान म्हणाले. पाकिस्तानला मोठया प्रमाणात नैसर्गिक साठे मिळावेत यासाठी आपण सर्व प्रार्थना करुया. एक्सॉन मोबिलच्या नेतृत्वाखाली हे खोदकाम सुरु आहे असे इम्रान म्हणाले. आधीच तीन आठवडयांचा विलंब झाला आहे. पण कंपन्यांकडून जे संकेत मिळत आहेत त्यानुसार पाकिस्तानच्या समुद्रात मोठया प्रमाणावर तेल आणि गॅसचे मोठे साठे सापडण्याची शक्यता आहे.

हे असे घडले तर पाकिस्तानला दुसऱ्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळेल असे इम्रान म्हणाले. इटलीची इएनआय आणि अमेरिकेची एक्सॉन मोबिल कंपनी संयुक्तपणे पाकिस्तानच्या समुद्रात गॅस साठयांसाठी उत्खनन करत आहे. दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे अनेक पाश्चिमात्य कंपन्या दशकभरापूर्वीच पाकिस्तानातून निघून गेल्या. मागच्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात पाकिस्तानच्या समुद्रात मोठया प्रमाणावर तेल साठे सापडण्याचे संकेत मिळाल्याने जवळपास दशकभराने एक्सॉन मोबिल कंपनी पाकिस्तानात परतली.