पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या जीविताला तालिबानी दहशतवाद्यांकडून असलेला धोका लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने कठोर उपाययोजना करावी अशी मागणी पाकिस्तानी लष्कराने केली आहे. चार वर्षे विजनवासात घालवून मुशर्रफ रविवारीच मायदेशी परतले आहेत. ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ते त्यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाचा प्रचार करणार आहेत.
माजी लष्करप्रमुख असलेल्या मुशर्रफ यांना मानणारा एक वर्ग आजही पाकिस्तानी लष्करात कार्यरत आहे. त्यामुळेच त्यांच्या जीविताचे रक्षण करण्याची मागणी पाकिस्तानी लष्कराने केली आहे. विशेष म्हणजे मुशर्रफ यांच्या पक्षातर्फे अशा प्रकारची कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. पक्षप्रवक्त्या आएशा इसहाक यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, मुशर्रफ यांच्या जीविताला धोका असला तरी पक्षातर्फे त्यांच्या सुरक्षेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तान सरकारनेही त्यांना सुरक्षाव्यवस्था पुरवली आहे. तालिबान्यांनी यापूर्वी त्यांच्या हत्येचा दोनदा प्रयत्न केला होता. या पाश्र्वभूमीवर मुशर्रफ यांना सुरक्षाकडे पुरवण्यात आले आहे.