पुलवामामधला हल्ला हे इम्रान खान सरकारचं कृत्य आहे अशी कबुली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी त्यांच्या संसदेत दिली आहे. पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचं यश आहे. पुलवामा हल्ल्याचं श्रेय फवाद चौधरी यांनी त्यांचा पक्ष PTI आणि इम्रान खान यांना दिलं आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतातील पुलवामा या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या घटनेत भारताचे ४० जवान शहीद झाले होते. फवाद चौधरी यांनी आता पुलवामा हल्ला हे त्यांच्या पक्षाचं आणि इम्रान खान सरकारचं यश असल्याचं म्हटलं आहे. भारताला आपण त्यांच्या घरात घुसून उत्तर दिलं असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.

भारतीय वायुसेनेचे पायलट अभिनंदन यांना सोडलं नसतं तर भारताने हल्ला केला असता असं पाकिस्तानच्या एका खासदाराने आजच म्हटलं होतं. मात्र पाकिस्तान हल्ल्यासाठी तयार होता असंही आता फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानने कायमच आमचा देश हे दहशतवाद्यांचं नंदनवन नाही असं म्हटलं आहे. मात्र आज पाकिस्तानच्या मंत्र्यांनेच पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. पाकिस्तानच्या संसदेत बोलताना गेल्यावर्षी भारतात झालेला पुलवामा हल्ला हे पाकिस्तान सरकारचं मोठं यश असल्याचं म्हटलं आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली हा हल्ला झाला आणि देशासाठी हे मोठं यश आहे असंही पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ ला काश्मीरच्या पुलवामा या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. आता पुलवामा हे पाक सरकारचं यश होतं असं फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे पाकिस्तानच होतं हे सत्य आता जगासमोर आलं आहे.