प्रत्येकाला आपली भावंडे प्रिय असतात. पण वय वाढत गेल्यावर लग्न, नोकरी, संसार अशा या ना त्या कारणाने भावंडे एकमेकांपासून दुरावतात. लग्नानंतर बहिणीपासून दुरावलेल्या एका महिलेने बहिण सोबत रहावी म्हणून तिचे आपल्याच नव-याशी ‘निकाह’ लावून दिला. पाकिस्तानमधील मुल्तान शहरात हा विचित्र लग्नसोहळा पार पडला. बहिणीला सोडून  राहू शकत नसल्याने या महिलेने बहिणीलाच सवत म्हणून घरात आणले.

मुल्तानमधील फराज नावाच्या व्यक्तीने दीड महिन्यापूर्वीच अलीना नावाच्या मुलीशी निकाह केला. पण काही दिवसांपूर्वीच अलीनाने तिची चुलत बहिण असणा-या अल्सिमासोबत फराजला दुसरा निकाह करायला भाग पाडले. आपल्या बहिणीला सोडून राहू शकत नसल्याने, तिने आपल्या नवऱ्यासोबतच अलिस्माचं लग्न लावल्याचं अलीनाने सांगितल्याचे पाकिस्तानच्या ‘दुनिया न्यूज’च्या वॄत्तात म्हटले आहे.

लहानपणीपासून अलीना आणि अलिस्मा दोघीही एकत्रच राहत होत्या. त्यामुळे त्यांना एकमेकींचा लळा लागला होता. अगदी शाळेपासून कॉलेजपर्यंत त्या एकत्रच होत्या. त्यांनी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एकमेकींबरोबर शेअर केली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. लग्नानंतर काही दिवस झाल्यानंतर अलीनाला सतत आपल्या बहिणीची आठवण येऊ लागली. यावर उपाय म्हणून तिने अलिस्माचं लग्न आपल्या नवऱ्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला.

अलीनाच्या या निर्णयामुळे अलीना आणि अलिस्मा दोघीही पुन्हा एकत्र रहायला लागल्या असून सुखात नांदत आहेत. तरी अलीनाच्या या विचित्र निर्णयाला समाजातून विरोध होताना दिसत आहे. या तिघांनाही म्हणजेच फराज आणि त्याच्या दोन्ही पत्नींना सातत्याने धमकावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र हे तिघेही आपल्या निर्णयावर ठाम आहेत.