लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि हक्कानी यांसारख्या दहशतवादी संघटनांमुळे भारतासारख्या प्रादेशिक देशाला आणि जगाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्याचे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानला केले आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तालिबान, हक्कानी, लष्कर-ए-तोयबा आणि अन्य संघटनांमुळे पाकिस्तान, त्यांचे शेजारी देश आणि अमेरिका यांना धोका आहे, असे केरी म्हणाले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझिझ यांच्यासह ते एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
या प्रदेशात सुरक्षेचे वातावरण प्रस्थापित होण्यासाठी सर्व दहशतवादी संघटनांना लक्ष्य करणे आवश्यक आहे. या संघटना केवळ याच देशात नाही तर जगात कोठेही पाय रोवू शकणार नाहीत, याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. काम कठीण आहे आणि ते झालेले नाही, असेही केरी म्हणाले.
पेशावरमध्ये लष्कराच्या शाळेवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याचा उल्लेख केरी यांनी केला. अमेरिकेतील प्रत्येक घरात हळहळ व्यक्त करण्यात आली, या हल्ल्यात ज्यांचा बळी गेला त्यांच्या दु:खात अमेरिका सहभागी आहे, असेही ते म्हणाले.