एफ-२२पी ही अण्वस्त्रसज्ज युद्धनौका मंगळवारी पाकिस्तान नेव्हीच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. चीनच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या सदर युद्धनौकेमुळे दोन्ही देशांमधील मैत्री अबाधित राहील, असा विश्वास पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केला.
पीएनएस अस्लत ही युद्धनौका कराचीतील नौकाबांधणी कारखान्यात तयार करण्यात आली असून त्यासाठी चीनचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. चीनकडून एफ-२२पी जातीच्या आणखी तीन युद्धनौका पाकिस्तानला मिळणार आहेत. पाकिस्तानने चीनसमवेत २००५ मध्ये केलेल्या करारानुसार या युद्धनौका पुरविण्यात येणार आहेत. सदर युद्धनौका भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणाऱ्या आणि भूपृष्ठावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून त्यावर इलेक्ट्रॉनिक युद्धयंत्रणाही उपलब्ध आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल आणि क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे या वेळी शरीफ म्हणाले. ग्वादर बंदर विकसित करण्यासाठी चीनने सहकार्य केले, असे ते म्हणाले.