पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग सहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. भारताचा आज ७३ वा स्वातंत्र्यदिन आहे. मोदींनी आज तब्बल ९२ मिनिटं भाषण केलं. स्वातंत्र्यदिनी मोदींनी सर्वाधिक वेळ केलेलं हे दुसरं भाषण आहे. यापूर्वी २०१६ सालच्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी सर्वाधिक वेळ भाषण केलं होतं.

आपल्या ९२ मिनिटाच्या भाषणात मोदींनी एकदाही पाकिस्तानचा उल्लेख केला नाही. तेच काल पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन होता. त्यावेळी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धाची धमकी दिली. जास्त वेळ त्यांनी भारताबद्दलच बोलण्यात खर्ची घातला. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्यावरुन त्यांनी आगपाखड केली.

दुसऱ्या बाजूला भारताच्या पंतप्रधानांनी भविष्याच्या दृष्टीने एक सकारात्मक चित्र देशासमोर मांडले. आजच्या भाषणात मोदींनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ची महत्वाची घोषणा केली. लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये समन्वय ठेवण्यासाठी भारतामध्ये लवकरच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती होणार आहे.

नेमकं कसं असेल ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’च पद
ष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची निर्मिती केली जाणार आहे. संरक्षण तज्ञांनी आतापर्यंत अनेकवेळा सीडीएस नियुक्तीची मागणी केली होती. १९९९ साली पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगिल युद्धानंतर सर्व प्रथम ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची शिफारस करण्यात आली होती.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख असेल. सीडीएस फोर स्टार अधिकारी असेल. लष्कर, हवाई दल किंवा नौदलातून सीडीएस निवडला जाईल. सीडीएस पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करेल. तिन्ही सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या उद्देशाने या पदाची निर्मिती करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.