पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरले असून येती अनेक दशके त्याला अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल, या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेल्या वक्तव्यावर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

येत्या अनेक दशकांमध्ये जगाच्या अनेक भागांमध्ये- मध्यपूर्वेत, अफगाणिस्तान व पाकिस्तान, मध्य अमेरिकेच्या काही भागांत, आफ्रिका व आशियात अस्थैर्य कायम राहील, असे ओबामा यांनी मंगळवारी केलेल्या अखेरच्या ‘स्टेट ऑफ दि युनियन’ भाषणात म्हटले होते.

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू इस्लामिक स्टेट (आयसिस) आणि अल-कायद्याकडून असलेल्या धोक्यावर असायला हवा, मात्र तो तिथवरच मर्यादित असू नये. कारण आयसिसशिवायही अफगाणिस्तान व पाकिस्तान, आफ्रिका व आशियामध्ये अस्थिरता सुरूच राहील. यापैकी काही ठिकाणे नव्या दहशतवादी संघटनांसाठी नंदनवन बनली असावीत; तर उर्वरित वांशिक संघर्ष किंवा दुष्काळाचे बळी ठरतील आणि त्यातून निर्वासितांचे लोंढे सुरू होतील, असेही ओबामा म्हणाले.

पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी ओबामा यांचे वक्तव्य नाकारले. पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील अस्थिरतेबाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जे काही म्हटले आहे, ते त्यांचे स्वत:चे तर्क असून त्याच्याशी वस्तुस्थितीचा काही संबंध नाही.  दहशतवाद व बंडखोरी याविरुद्ध पाकिस्तान निर्णायक कारवाई करत असून दहशतवादाच्या विरोधातील लढय़ात आम्हाला मोठे यश मिळाले आहे. येत्या काळात तुम्हाला पाकिस्तानमध्ये आणखी स्थैर्य पाहायला मिळेल, असे अझीझ यांनी सांगितले.