भारत आणि पाकिस्तान या देशांदरम्यान ठप्प झालेला परस्पर संवाद पुन्हा सुरू करण्याची कुठलीही घाई न दर्शवता, भारताने सर्व मुद्दय़ांवर बोलणी करण्याची तयारी दाखवेपर्यंत वाट पाहण्याचे ठरवले असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे.
दोन्ही देशांमधील रखडलेला संवाद पुन्हा सुरू करण्याबाबत अजिबात घाई दाखवायची नाही असा तत्त्वत: निर्णय घेण्यात आला आहे, असे पाकिस्तानचे भारतातील राजदूत अब्दुल बसित यांनी काल रात्री पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान हजर असलेल्या पंतप्रधान कार्यालयातील एका सूत्राने सांगितल्याचे वृत्त ‘डॉन’ या दैनिकाने दिले आहे.
भारत हा आमचा महत्त्वाचा शेजारी असून, आम्हाला त्या देशाशी ‘परस्पर आदर आणि सार्वभौम समानता’ या आधारावर सामान्य संबंध हवे आहेत, असे शरीफ यांनी या चर्चेत बासित यांना सांगितले. तथापि भारताने चर्चेची आणि सर्व मुद्दय़ांवर बोलण्याची तयारी दाखवेपर्यंत पाकिस्तान वाट पाहील, असे ते म्हणाल्याचे सूत्राने सांगितले, असे या वृत्तात म्हटले आहे. पाक सरकारने भारताबाबत कठोर धोरण स्वीकारण्याचा, तसेच पाकिस्तानातील दहशतवादी कृत्यांमध्ये भारताच्या कथित सहभागाबाबतची आपली चिंता निरनिराळ्या व्यासपीठांवर मांडण्याचाही निर्णय घेतला असल्याचे एका वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्याचा हवाला देऊन या दैनिकाने सांगितले. गतवर्षी ऑगस्टमध्ये इस्लामाबाद येथे दोन्ही देशांत विदेश सचिवांच्या पातळीवरील बोलणी होऊ घातलेली असतानाच बसित यांनी काश्मिरी फुटीरवाद्यांशी चर्चा केल्यामुळे भारताने ही बोलणी रद्द केली होती.