इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदेला विश्वासात न घेता काश्मीरसह सर्व प्रश्नांवर  भारताशी चर्चा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडल्याबाबत विरोधकांनी  पंतप्रधान इम्रान खान  यांच्यावर टीका केली आहे. सिनेट हे तेथील संसदेचे उच्च सभागृह असून त्याची बैठक सोमवारी सायंकाळी झाली, त्यात सरकारने भारताशी बोलणी सुरू करण्याच्या मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू करण्यात आली.

१४ सप्टेंबर रोजी इम्रान खान यांनी पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते,की संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री शहा महंमद कुरेशी व त्यांच्या भारतीय समपदस्थ सुषमा स्वराज यांची न्यूयॉर्क येथे भेट घडवून आणावी. खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १८ ऑगस्टच्या पत्रावर उत्तर देताना असे म्हटले होते,की पाकिस्तान भारताशी सकारात्मक व अर्थपूर्ण चर्चा करील. पाकिस्तानच्या सिनेटचे माजी अध्यक्ष व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते मियॉ रझा रब्बानी  यांनी सांगितले,की इम्रान खान यांनी भारताशी चर्चेचा मांडलेला प्रस्ताव अनाकलनीय होता, कारण काश्मीरमधील परिस्थिती अशांत आहे.

मोदी यांचे खान यांना पाठवण्यात आलेले पत्र दिखाऊ स्वरूपाचे होते, त्याला उत्तर म्हणून खान यांनी चर्चेचा प्रस्ताव मांडायला नको होता. पाकिस्तान दहशतवादावर चर्चा करण्यास तयार आहे हे खान यांच्या पत्रातील वाक्य सर्वात आक्षेपार्ह होते. सिनेटर अब्दुल गफूर हैदरी यांनी सांगितले,की इम्रान खानसारखी एक व्यक्ती भारताला चर्चेचा प्रस्ताव कुणाला न विचारता कसा देऊ शकते. संसदेला विश्वासात न घेता खान यांनी मोदी यांना पाठवलेले पत्र हे योग्य नव्हते. खान यांनी यापुढे काळजी घेतली पाहिजे. त्यांनी कुठलेही निर्णय घाईने न घेता त्याआधी विचार केला पाहिजे.

माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले, की खान यांनी मोदींना पाठवलेले पत्र हे त्यांच्या पत्राला दिलेले उत्तर होते. भारताबरोबरच्या काश्मीरसह सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याची पाकिस्तानची इच्छा आहे.

गेली सत्तर वर्षे दोन्ही देश एकमेकांशी लढत आहेत. भारताची इच्छा असेल तर आणखी सत्तर वर्षे लढत राहतील. अणुयुद्ध झाले तर उपखंडात मोठय़ा प्रमाणावर विनाश होईल. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे फैजल जावेद यांनी सांगितले, की खान यांच्या प्रयत्नांना बाकीच्यांनी साथ देणे आवश्यक होते, उलट विरोधकांनी यात हेवेदावे साधण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे या सगळ्या प्रश्नांवरचे म्हणणे मांडले जाणे आवश्यक आहे.