कराचीमधल्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ काल अपघात घडला. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) पीके-८३०३ हे विमान दाट लोकवस्तीच्या भागावर कोसळले. या भीषण विमान अपघातातून बचावलेल्या मोहम्मद झुबेर यांनी त्यांचा भयावह अनुभव सांगितला. त्यातून परिस्थिती किती भीषण होती, ते दिसून येते.

पीआयएचे हे प्रवासी विमान लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात असताना कोसळले अशी माहिती या दुर्घटनेतून बचावलेल्या मोहम्मद झुबेर यांनी दिली. “वैमानिकाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला होता. विमानाच्या चाकांनी जमिनीला स्पर्श सुद्धा केला होता, पण त्यानंतर विमानाने पुन्हा उड्डाण केले” असे झुबेर यांनी सांगितले.

“दहा मिनिटं आकाशात उड्डाण केल्यानंतर लँडिंगचा दुसरा प्रयत्न करणार असल्याचे वैमानिकाने प्रवाशांना सांगितले. त्यानंतर धावपट्टीच्या दिशेने उतरत असताना विमान कोसळले” असे झुबेर म्हणाले. पेशाने इंजिनिअर असलेल्या झुबेर यांच्यावर कराचीमधील नागरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

आणखी वाचा- Audio Clip: ‘हे’ ठरले वैमानिकाचे शेवटचे शब्द; कराची विमानतळावरील ATC बरोबर संवाद साधताना म्हणाला…

“माझे डोळे उघडले तेव्हा सर्वत्र धुराचे साम्राज्य होते. आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. सर्व बाजूंनी किंकाळया ऐकू येत होत्या. मला लोक दिसतं नव्हते. फक्त त्यांच्या किंकाळया ऐकू येत होत्या” असे झुबेर यांनी सांगितले.

आणखी वाचा- ‘देव तारी त्याला कोण मारी’, ९७ जणांचा मृत्यू पण फक्त दोघे बचावले

“मी माझा सीट बेल्ट सोडला व जागेवरुन उठलो, त्यानंतर मला प्रकाश दिसला. मी त्या दिशेने गेलो. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी मी १० फूटावरुन उडी मारली” असे त्यांनी सांगितले. या अपघातातून मोहम्मद झुबेर आणि पाकिस्तानील बँक ऑफ पंजाबचे प्रमुख झफर मसूद बचावले आहेत. बँक ऑफ पंजाबचे सीईओ झफर मसूद यांना फक्त फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.