पाकिस्तानमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातासंदर्भातील धक्कादायक माहिती चौकशीनंतर समोर आली आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलदरम्याच्या संवादामध्ये झालेल्या मानवी चूकीमुळे हा अपघात झाला. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाचा २२ मे रोजी लॅण्डींगच्या काही मिनीटं आधी विमानतळापासून हाकेच्या अंतरावर अपघात झाला. कराची विमानतळावर उतरण्याच्या आधीच हे विमान लोकवस्ती असणाऱ्या परसिरामध्ये कोसळले. विमानातील ९९ पैकी ९७ प्रवाशांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला.

“वैमानिक तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील व्यक्तीनेही नियमांचे पालन केलं नाही,” असं पाकिस्तानचे नागरी हवाई उड्डाण मंत्री गुलाम सरवार खान यांनी स्पष्ट केलं आहे. संसदेमध्ये या अपघाच्या चौकशी अहवालाबद्दल माहिती देताना गुलाम सरवार खान यांनी ही माहिती दिली. एअर बस ए ३२० हे विमान लॅण्ड करताना वैमानिक एकमेकांशी करोना महामारीसंदर्भात गप्पा मारत होते असंही गुलाम यांनी या अहवालातील माहिती सांगताना म्हटलं आहे. “वैमानिक आणि सह-वैमानिक यांचे विमान उतरवतानाही गप्पा मारत होते. हे दोघे करोना विषाणूसंदर्भात गप्पा मारत होते,” असं गुलाम यांनी सांगितलं. यासंदर्भातील वृत्त एफपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

पाकिस्तानमधील या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या टीममध्ये फ्रान्स सरकारमधील अधिकारी आणि हवाई उड्डाण क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ मंडळीही होती. या सर्वांना विमान अपघातासंदर्भातील माहिती, व्हॉइस रेकॉर्डर वगैरे तपासून पाहिल्यानंतरच अहवाल तयार केला आहे. “हे विमान उडण्यासाठी १०० टक्के म्हणजेच पूर्णपणे सुरक्षित होते. अपघात होण्यामागे कोणतेही तांत्रिक कारण नाहीय,” असंही गुलाम यांनी संसदेत सांगितलं.

कराची विमानतळावर झालेला हा अपघात पाकिस्तानच्या मागील आठ वर्षांच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात ठरला. पाकिस्तानमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या दोन महिन्याच्या लॉकडाउननंतर विमान उड्डाणाला परवानगी देण्यात आल्यानंतर काही दिवसांतच हा अपघात घडला. विमानामधील अनेक प्रवासी हे ईद साजरी करण्यासाठी आपल्या नातेवाईकांकडे जात होते.