पाकिस्तानमधील कराची विमानतळाजवळ लँडिंगच्या वेळी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) विमानाचा शक्रुवारी भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये मोठी जिवीतहानी झाली आहे. विमानातील ९९ पैकी ९७ प्रवासी ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तर विमान निवासी परिसरात कोसळल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र विमान कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या कही सेकंद आधीच हा अपघात कसा झाला याबद्दलच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षादरम्यान (एअर ट्रॅफिक कंट्रोल) झालेल्या शेवटच्या संवादावरुन विमानाची दोन्ही इंजिन बंद पडल्याचे वैमानिकाने कळवले होते.

विमानाचा अपघात होण्याच्या काही सेकंद आधी वैमानिकाने विमानाची दोन्ही इंजिन बंद पडल्याचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला कळवलं होतं. या दोघांमधील संवादाची ऑडिओ क्लिप लाइव्ह एटीसी डॉट नेट या वेबसाईटने अपलोड केली आहे. जगभरातील हवाई वाहतुकीसंदर्भातील घडामोडींसंदर्भातील बातम्यांसाठी ही वेबसाईट ओळखली जाते.

“आम्ही परत येतोय सर. आमची दोन्ही इंजिन निकामी झालेत,” असं वैमानिक एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते.. त्यानंतर विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या रिकाम्या करण्यात आल्या. मात्र विमानतळाच्या हद्दीत येण्याच्या काही सेकंदआधीच विमान कोसळले. विमानतळाच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या दाट लोकवस्तीच्या परिसरात हे विमान कोसळलं. विमान कोसळण्याच्या अगदी काही क्षण आधी वैमानिकाने “मे डे… मे डे… मे डे…” असं ओरडल्याचंही या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतं. हवाई तसेच जलवाहतुकीदरम्यान जिवघेण्या परिस्थितीसंदर्भात माहिती देण्यासाठी ‘मे डे…’ या शब्दाचा वापर केला जातो. या आवाजानंतर ऑडिओमध्ये कोणताच आवाज येत नाही. ‘अरब न्यूज पाकिस्तान’नेही ट्विटवरुन ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला?

पीआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान उतरण्याच्या काही मिनिटं आधी ते रडावर दिसेनासे झाले. विमानामध्ये तांत्रिक अडचणी असल्याचे वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवलं होतं अशी माहिती पीआयएचे मुख्य कार्यकारी एअर व्हाइस मार्शल अरशद मलिक यांनी दिली. उड्डाणाच्या आधीच विमानामध्ये तांत्रिक अडचणी असल्याची शक्यता मलिक यांनी फेटाळून लावली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विमान उड्डाणाच्या आधी सर्व सुरक्षेसंदर्भातील नियमांचे पालन करण्यात आलं होतं अशी माहिती दिली. “अपघात नक्की कशामुळे झाला हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. यासंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिली जाईल,” असं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यताही मलिक यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने या अपघाच्या चौकशीसाठी चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे.

(Credit: Google Images via Twitter/@FootballHmk)

शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत ८२ जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातामधून दोन प्रवासी वाचले असून अन्य सर्व ९७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. असं असतानाच आता या विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. लाहोरहून उड्डाण केलेले पीके-८३०३ हे विमान कराचीला उतरण्यासाठी अवघ्या एका मिनिटाचा कालावधी राहिलेला असतानाच मलीर येथील मॉडेल कॉलनीजवळच्या जिना गार्डन परिसरात कोसळले. विमानाच्या अवशेष तसेच प्रवाशांचे मृतदेह काढण्याचे काम अद्याप सुरू असून त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.