नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात असंतोष निर्माण करण्याच्या ‘अधिक व्यापक कटाचा’ भाग म्हणून अफगाणिस्तानातील १०० कट्टर दहशतवादी काश्मीरमध्ये आणण्याची योजना पाकिस्तान आखत असल्याचे सुरक्षा सूत्रांनी गुरुवारी सांगितले.

याशिवाय, जैश-ए-मोहम्मदचे सुमारे १५ दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानमधील लिपा खोऱ्यातील दहशतवादी तळांवर आधीच वाट पाहात आहेत, असे गुप्तचर यंत्रणाच्या अहवालांच्या हवाल्याने या सूत्रांनी सांगितले.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील दहशतवादी गट येत्या काही आठवडय़ांत भारतातील अनेक प्रमुख शहरांमधील महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करू शकतात.

भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेऊन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती झपाटय़ाने ढासळत असल्याचे चित्र आंतरराष्ट्रीय समुदायापुढे उभे करण्यासाठी दहशतवादी हल्ल्यांची मालिका घडवून आणण्याची पाकिस्तानची योजना आहे.

पाकिस्तान अफगाणिस्तातून १००हून अधिक कट्टरवाद्यांना आणत असून, येत्या काही आठवडय़ात त्यांना काश्मीरमध्ये घुसवले जाईल, अशी विश्वासार्ह गुप्तचर माहिती आमच्याकडे आहे, असे लष्कराच्या एका सूत्राने सांगितले.

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा भाऊ मुफ्ती रौफ असगर याने काश्मीरमध्ये कट्टर दहशतवाद्यांना घुसवण्याच्या प्रमुख हेतूने या संघटनेच्या बहावलपूर येथील मुख्यालयात तिच्या उच्चपदस्थ कमांडरसोबत १९ व २० ऑगस्टला बैठक घेतल्याचा दावा सूत्रांनी केला.