करोना व्हायरस विरोधातील लढाईत लॉकडाउन एक महत्वाचा उपाय आहे. लॉकडाउनमुळे या व्हायरसचा मोठया प्रमाणावर होणारा फैलाव रोखता येतो. जगातील अनेक प्रमुख देशांनी करोना व्हायरसविरोधातील लढाईत हाच मार्ग अवलंबला आहे. भारतातही त्याचमुळे २१ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. पण शेजारच्या पाकिस्तानात अजूनही लॉकडाउन झालेले नाही.

त्या देशात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असली तरी पाकिस्तानला लॉकडाउन परवडणारे नाही. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लॉकडाउनचा निर्णय कसा चुकीचा आहे हे पटवून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव खराब करत आहेत. त्यांची ही चूक पाकिस्तानी माध्यमांनीच त्यांना दाखवून दिली.

सोमवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात इम्रान खान यांनी भारतात लॉकडाउनच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींनी जनतेची माफी मागितली असे चुकीची माहिती दिली होती. मोदींनी लॉकडाउनबद्दल नाही तर त्यामुळे लोकांना जो त्रास होतोय, त्याबद्दल माफी मागितली होती. रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये बोलताना मोदींनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय आवश्यक होता हे स्पष्ट केले.

मोदींच्या नावाचा वापर करुन इम्रान खान दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनीच त्यांना दाखवून दिले. सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे चीनला दूषणे देत आहे. पण इम्रान खान यांनी याउलट आपल्या भाषणात चीनचे कौतुक केले. चीनने करोना व्हायरसला कसे नियंत्रित केले त्याचे दाखले दिले.