मोदींनी जे गुजरातमध्ये केलं तेच दिल्लीतही दिसतंय, असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हिंदुत्वाचा अजेंडा १९३० च्या दशकात हिटलरने राबवलेल्या नाझीवादाप्रमाणेच आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. इम्रान खान यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचाराचा वणवा पेटला होता. आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. या हिंसाचारातील मृतांचा आकडा आता ४२ वर पोहोचला आहे. तर २५० हून अधिक जण यामध्ये जखमी झाले आहे. यावरून इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या ठिकाणी जे केलं तेच आज दिल्लीत दिसतंय अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.

यापूर्वी इम्रान खान यांनी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतरही मोदींवर टीका केली होती. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेऊन घातक चूक केली आहे. मोदी यांनी पाकिस्तानला निवडणुकीत बळीचा बकरा केले होते, त्यामुळे त्यांना जनमताचा कौल मिळाला. त्यामुळे त्यांनी सत्तेवर येताच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला. आता ते त्यावर मागे जाऊ शकत नाहीत. हिंदू राष्ट्रवादाचा राक्षस आता बाटलीबाहेर आला आहे तो आता बाटलीत परत भरणे शक्य नाही. सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यातून काश्मीर स्वतंत्र होईल, यात शंका नाही,” असं ते म्हणाले होते.