एकीकडे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाखाली डमगलेल्या आर्थिक परिस्थितीत पाकिस्तानकडून आर्थिक मदतीची मागणी होत आहे. तर दुसरीकडे मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याचं दिसत आहे. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या डोमिसाईल नियमांविरुद्ध लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. जगाचं लक्ष करोनावर असताना भारत काश्मीरमधील लोकसंख्येचं चित्र बदलण्यासाठी गैरफायदा घेत असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मखदूम शाह महमूद कुरैशी यांनी केला.

कुरेशी यांच्याकडून रविवारी यासंबंधी पत्र देण्यात आलं. पाकिस्तानच्या या नव्या कुरापतीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तीन महिन्यांपूर्वी पाकिस्ताननं चीनच्या मदतीनं सुरक्षा परिषदेता काश्मीरचा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी पाकिस्तान तोंडावर पडला होता. याचं उत्तर योग्य वेळी देण्यात येईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं दिली. ज्या दिवशी त्यांची करोनाचा सामना करण्यासाठी जगभरात मदत मागितली त्याच दिवशी हे पत्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा भारत काश्मीरमधील लोकसंख्येचं चित्र बदलण्यासाठी गैरफायदा घेत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये डोमिसाईल लागू करण्यात आले आहे. १५ वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये राहत असलेल्या नागरिकांना याचा फायदा मिळणार आहे. तसंच त्यांना सरकारी नोकऱ्याही देण्यात येणार आहेत.

आणखी वाचा- पाकच्या पंतप्रधानांनी पसरले जगासमोर हात : करोनामुळे भूकबळी जाईल, आम्हाला मदत करा

आम्हाला मदत करा….
लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे. रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगाला आणि देशाला आवाहन करणारा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर कर केला आहे. “आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि अंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांना माझं आवाहन आहे की, या संकटाच्या काळात पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी काही तरी ठोस मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ करण्यात यावं,” असं इम्रान खान म्हणाले होते. दरम्यान, इम्रान खान यांचे हे आवाहन म्हणजे करोनाच्या निमित्तानं देशावर असणारं कर्ज माफ करण्याची मोहीम आहे असं मानलं जात आहे.