अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानदरम्यान चर्चा व्हावी यासाठी मध्यस्थी करण्याच्या प्रस्तावावर भारताने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. याआधीही इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचं समर्थन करताना काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेने सुटणार नाही असे म्हटले होते.

इम्रान खान यांनी ट्विट करत भारताच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या ७० वर्षांपासून कोणताही तोडगा निघू न शकलेल्या काश्मीर मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला असताना त्यावर भारताने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. काश्मीरमधील जनतेच्या अनेक पिढ्यांनी खूप काही सोसलं असून अद्यापही रोज हालअपेष्टा सोसत आहेत. लवकरच या मुद्द्यावर तोडगा काढला पाहिजे.

याआधी बोलताना इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करताना मोठी भूमिका निभावू शकतात असं म्हटलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर फोक्स न्यूजशी बोलताना काश्मीर मुद्द्यावर द्विपक्षीय चर्चेने कधीच तोडगा निघणार नाही असं म्हटलं होतं. या बैठकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करण्यास सांगितलं असल्याचा दावा केला होता. पण भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला.

भारत-पाकिस्तानमध्ये चर्चेने काश्मीर प्रश्न सुटणार नाही – इम्रान खान

काश्मीर प्रकरणी तिसऱ्या पक्षाशी चर्चा नाहीच; जयशंकर यांचे स्पष्टीकरण

भारताने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे जोरदार निषेध नोंदवला. भारताच्या निषेधानंतर अमेरिकेने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काश्मीर वाद भारत आणि पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य केले. जी २० परिषदेच्यावेळी ओसाकामध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्याकडे काश्मीर प्रश्नी मदत मागितली होती असे विधान ट्रम्प यांनी केले होते.