जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यातच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पाकिस्तान आपला रोष व्यक्त करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर विरोधी पक्षांनीही निशाणा साधला आहे. त्यातच आता इम्रान खान यांच्या दुसऱ्या पत्नी रेहम खान यांनी काश्मीरप्रकरणी एक गौप्यस्फोट केला आहे.

इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काश्मीरप्रश्नी एक गोपनीय व्यवहार केली असल्याचा आरोप रेहम खान यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांना खुश करण्यासाठी इम्रान खान यांनी हा व्यवहार केला. याच कारणामुळे ते काश्मीरप्रश्नी कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानात त्यांच्या विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या प्रकरणावरून संसदेतही विरोधकांकडून इम्रान खान यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

“आम्हाला पूर्वीपासूनच काश्मीर पाकिस्तानचा भाग बनेल असं शिकवलं गेलं. परंतु काश्मीरचा आता व्यवहार करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये जे काही झालं ते भारताच्या पंतप्रधानांना खुश करण्यासाठी केल्याचा परिणाम आहे,” असं रेहम खान म्हणाल्या. रेहम खान यांनी यापूर्वीही इम्रान खान यांच्यावर अनेक आरोप केले होते. गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या निवडणुकांदरम्यान, रेहम खान यांचं एक पुस्तक प्रदर्शित झालं होतं. त्यांच्या या पुस्तकाची जगभरात चर्चा झाली होती. त्यांनी इम्रान खान हे पाकिस्तानी सैन्याच्या हातातील बाहुले असल्याचंही म्हटलं होतं.