जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची बाजू मांडली असून एक संधी देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. ‘इम्रान खान यांनी नुकताच पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारला आहे. त्यांना एक संधी दिली गेली पाहिजे’, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी पुराव्यांविना पाकिस्तानला जबाबदार ठरवलं जात नसल्याचंही सांगितलं.

‘पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा पुरावा देऊनही पाकिस्ताने कट रचणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. आता बोलण्यात आणि करण्यात साम्य असलं पाहिजे’, असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. इम्रान खान यांच्या पत्रकार परिषदेवर रिट्विट करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नुकताच पदभार स्विकारला असल्याने त्यांना एक संधी मिळाली पाहिजे’.

याआधी मंगळवारी इम्रान खान यांनी भारताने युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर उत्तर देणार अशी उघड धमकी दिली . भारतात सध्या निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा सुरु आहे हे मी समजू शकतो असंगी त्यांनी यावेळी म्हटलं. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी कोणताही पुरावा नसताना भारताकडून पाकिस्तानवर आरोप केला जात असल्याचं सांगत इम्रान खान यांनी आरोप फेटाळून लावत हात झटकले. इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

कोणताही पुरावा नसताना पाकिस्तानवर आरोप करण्यात आले आहेत. या हल्ल्याचा पाकिस्तानला काय फायदा होणार आहे. पाकिस्तान स्थिरतेकडे जात असताना अशा गोष्टी पाकिस्तान करण्याचा विचार करणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हा नवा पाकिस्तान आहे. नवी विचारसरणी आहे असं यावेळी इम्रान खान यांनी सांगितलं. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या चौकशीला आम्ही तयार असून जे पुरावे आहेत ते भारताने आम्हाला द्यावेत अशी मागणी करत आम्ही कारवाई करु असं आश्वासन इम्रान खान यांनी दिलं. यावेळी त्यांनी भारताशी कधीही चर्चा करायचं म्हटलं की आधी दहशतवादावर चर्चा करण्याची मागणी केली जाते. आम्ही दहशतवादावर चर्चा करण्यास तयार आहोत असं इम्रान खान यांनी यावेळी सांगितलं.

दहशतवाद मिटवावा अशी आमचीही इच्छा आहे. 70 हजार पाकिस्तानी दहशतवादामुळे मारले गेले आहेत असं यावेळी त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, भारतात नवी विचारसणी येण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये अशी परिस्थिती का आहे याचा विचार भारताने करण्याची गरज आहे. काश्मीरचा मुद्दा चर्चेने सोडवला पाहिजे याकडे भारत लक्ष का देत नाही आहे असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.