पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना करोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियम आणि समन्वय विभागासाठी इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक म्हणून काम करणारे फैजल सुल्तान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच इम्रान खान यांनी चिनी करोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला होता.

१८ मार्चला इम्रान खान यांनी चिनी करोना प्रतिबंधक लस सिनोफार्म (Sinopharm) लसीचा डोस घेतला होता. पाकिस्तानमध्ये सध्या फक्त ही एकमेव लस उपलब्ध आहे. या लसीचे दोन डोस घेणं अनिवार्य आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, चीनने १ फेब्रुवारीला पाकिस्तानला सिनोफार्म लसीटे पाच लाख डोस दिले होते. यानंतर पाकिस्तानमध्ये लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली.

१७ मार्चला चीनकडून दुसऱ्या टप्प्यातील लसींच्या डोसचा साठा पाठवण्यात आल्यानंतर इम्रान खान यांनी लस टोचून घेतली होती.