कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी भारताला मोठे यश मिळाले. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान, त्यांनी कुलभूषण हे पाकिस्तानच्या नागरिकांविरोधात केलेल्या अपराधाचे दोषी आहेत. पाकिस्तान या प्रकरणी कायद्याप्रमाणे कारवाई करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना ‘हेरगिरी आणि दहशतवादा’च्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचे भारतात तीव्र पडसाद उमटले. भारताने या निर्णयाविरोधात ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्या. अब्दुलक्वी अहमद युसूफ यांच्या अध्यक्षतेखालील १६ सदस्यीय पीठाने या प्रकरणात भारत आणि पाकिस्तान यांची बाजू ऐकून घेऊन २१ फेब्रुवारी २०१९ रोजी निर्णय राखून ठेवला होता. अखेर दोन वर्षे आणि दोन महिने चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने बुधवारी भारताच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा फेरविचार करण्याचे निर्देश पाकिस्तानला देतानाच न्यायालयाने व्हिएन्ना कराराच्या उल्लंघनाबाबतचा भारताचा मुद्दाही ग्राह्य धरला.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले. हा भारताचा मोठा विजय असून, या निर्णयाने भारताच्या भूमिकेला बळकटी मिळाली आहे. कुलभूषण यांची लवकरच सुटका होऊन त्यांना भारतात परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले होते. तसेच न्यायालयाच्या निर्णयाची पाकिस्तानने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षाही परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली होती.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनने पाकिस्तानला धक्का दिला. कुलभूषण प्रकरणात चीनच्या न्यायाधीशांनीही भारताच्या बाजूने निर्णय दिला. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करण्याच्या न्यायालयाच्या बहुमताच्या बाजूने चीनचे न्यायाधीश हनकीन यांनी कौल दिला. हा भारतासाठी मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे.