भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधली शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याचे समजते आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यात बैठक व्हावी यासाठी इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांकडे शब्द टाकल्याचेही वृत्त आहे. न्यूयॉर्कमध्ये पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीत सुषमा स्वराज यांनी कुरैशी यांचीही भेट घ्यावी यासाठी इम्रान खान आग्रही असल्याचे समजते आहे.

गेल्या काही दिवसांपासून संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री एकमेकांना भेटणार नाहीत अशी चर्चा सुरु होती. याबद्दल विविध चर्चा होत होत्या. मात्र इम्रान खान यांच्या पत्रामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांती प्रस्ताव सुरू करण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे पहिले पाऊल आहे अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांती चर्चा डिसेंबर २०१५ मध्ये सुरु झाली होती. मात्र पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ही चर्चा स्थगित करण्यात आली. आता इम्रान खान यांनी ही चर्चा पुन्हा सुरु व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी दहशतवाद, काश्मीर प्रश्न आणि एकमेकांशी संबंधित असलेले इतर मुद्दे चर्चेने सोडवले पाहिजेत अशी विनंती इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पत्रात केल्याचे समजते आहे.