पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची लंडन येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर मंगळवारी हृदयशस्त्रक्रिया होणार आहे. शरीफ यांना शस्त्रक्रियेसाठी आपण सदिच्छा देत असून त्यांनी लवकर बरे व्हावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
शरीफयांची कन्या मरीयम नवाझ हिने ट्विटरवर म्हटले आहे की, वडिलांवर ओपन हार्ट सर्जरी केली जाणार आहे. यात लोकांच्या सदिच्छा हेच मोठे औषध आहे असे आम्ही मानतो. शरीफ हे नेहमीच्या तपासणीसाठी गेले असता त्यांना डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरीचा सल्ला दिला आहे. हृदयरोगतज्ज्ञांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना हृदयात बिघाड असल्याची लक्षणे दिसून आली व त्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय जाहीर करण्यात आला.
संरक्षण मंत्री ख्वाजा असीफ यांनी सांगितले की, डॉक्टरांनी शरीफ यांना ओपन हार्ट सर्जरीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे लंडनच्या रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी गेल्या काही आठवडय़ात शरीफ यांची लंडनला ही दुसरी भेट आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानात त्यांची तपासणी करण्यात आली व नंतर लंडनला त्यांनी जावे असे ठरवण्यात आले. २२ मे रोजी ते लंडनला गेले व आठवडाभरात परत येणे अपेक्षित होते पण आता शस्त्रक्रियेमुळे मायदेशी आगमन लांबले आहे. ब्रिटनमधील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या प्रिन्सेस ग्रेस हॉस्पिटल येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान पनामा पेपर्समध्ये शरीफ यांचे नाव आले असून विरोधकांनी चौकशीसाठी दडपण आणले आहे.