पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंगळवारी येथील ऐतिहासिक जामा मशिदीस भेट देऊन तेथे प्रार्थना म्हटली. त्यानंतर त्यांनी जुनी दिल्ली भागातील लाल किल्ल्यासही भेट दिली.
आशिया खंडातील सर्वात मोठय़ा मशिदींमध्ये जामा मशिदीचा समावेश होतो. सदर मशीद मोगलांच्या काळात उभारण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी आलेल्या शरीफ यांनी मंगळवारी मशिदीत जाण्याचा योग साधला. त्यांच्यासमवेत त्यांच्या शिष्टमंडळातील इतर सदस्यही होते.
नरेंद्र मोदी यांनी शरीफ यांना आमंत्रित केल्यानंतर ते येथे आले. ते चांगल्या भावनेने येथे आल्याचे आपल्याला जाणवले, असे जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी सांगितले.
उभय देशांमधील संबंध सुधारून तणाव आणि कडवेपणा संपुष्टात आला पाहिजे, अशी शरीफ यांची इच्छा असल्याचे बुखारी म्हणाले. मी येथे आलो किंवा मोदी पाकिस्तानात आले तरी उभय देशांमधील संबंध शक्य तितक्या लवकर सुधारावेत, असे शरीफ यांनी बुखारी यांना सांगितले.