पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी तणावपूर्ण द्विपक्षीय संबंधांसाठी भारताला जबाबदार धरले आहे. भारताच्या विस्तारवादी भूमिकेमुळेच दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत, असे अब्बासी यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात म्हटले. ‘भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकतात. मात्र भारताचे विस्तारवादी धोरण यामध्ये मोठा अडथळा आहे,’ असे अब्बासी यांनी म्हटले.

‘शेजारी राष्ट्रासोबतचे संबंध सकारात्मक असावेत, असे पाकिस्तानला वाटते. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान इच्छुक आहे. भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान सरकारने अनेकदा संवादाच्या माध्यमातून प्रयत्न केले. शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानकडून पुढाकार घेण्यात आला. मात्र दुर्देवाने भारताच्या विस्तारवादी हेतूंमुळे यामध्ये अडथळा आला,’ असे अब्बासी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले. यावेळी चीनचे उपपंतप्रधान वांग यांग उपस्थित होते. यांग पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी इस्लामाबादला आले होते.

‘दोन देशांमधील वाद सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केले. यावेळी अब्बासी यांनी काश्मीर राग आळवला. ‘काश्मीरवरुन निर्माण झालेला वाद संपुष्टात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्राने प्रयत्न करायला हवेत. संयुक्त राष्ट्राने या वादात योग्य भूमिका पार पाडायला हवी,’ असे त्यांनी म्हटले. यावेळी चीन आणि पाकिस्तान प्रतिकूल परिस्थितीतही एकमेकांसोबत ठामपणे उभे असल्याचे चीनच्या उपपंतप्रधानांनी म्हटले.

पनामा पेपर्स प्रकरणात नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपद गमवावे लागल्यानंतर शाहिद खाकन अब्बासी यांनी १ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेतली. अब्बासी पाकिस्तानचे १८ वे पंतप्रधान आहेत. ‘वादांमुळे गेल्या ५० वर्षांमध्ये दक्षिण आशियाने खूप काही सहन केले आहे. जोपर्यंत हे वाद संपुष्टात येणार नाहीत, तोपर्यंत या भागाची प्रगती होणार नाही,’ असे म्हणत अब्बासी यांनी वारंवार त्यांच्या भाषणात काश्मीर प्रश्नाचा उल्लेख केला.