भारताला चर्चा करण्याची इच्छा असून, त्यांनी तसे संकेत दिले आहेत, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सल्लागाराने केला आहे. मोइद युसूफ असे या सल्लागाराचे नाव आहे. पाकिस्तानची राष्ट्रीय सुरक्षा आणि रणनितीक धोरण ठरवण्याच्या मुद्यावर ते इम्रान खान यांचे सल्लागार आहेत. संवाद सुरु करण्याची इच्छा असल्याचा संदेश भारताने पाकिस्तानला पाठवला आहे. पण संदेशात नेमके काय म्हटले आहे, त्याबद्दल मोइद युसूफ यांनी खुलासा केला नाही.

भारतासोबत चर्चा करण्याआधी पाकिस्ताननेही काही अटी ठेवल्याचे मोइद युसूफ यांनी सांगितले. यात जम्मू-काश्मीरमधून राजकीय कैद्यांची सुटका, काश्मिरींना चर्चेमध्ये सहभागी करुन घेणे, निर्बंध उठवणे, अधिवास कायदा रद्द करणे आणि मानवी हक्काचे उल्लंघन रोखणे अशा अटी घातल्याचे मोइद युसूफ म्हणाले. “जम्मू-काश्मीरमध्ये बदल हा अंतर्गत विषय नाही, हा संयुक्त राष्ट्राचा विषय आहे” असे मोइद युसूफ यांनी म्हटले आहे.

‘द वायर’ या वेबसाइटसाइटला दिलेल्या मुलाखतीत युसूफ यांनी ही विधाने केली आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले व जम्मू-काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन केले.

“दोन्ही देशांनी चर्चेसाठी तयार झाले पाहिजे. काश्मीर आणि दहशतवाद या दोन प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे. पाकिस्तान शांततेसाठी तयार आहे आणि आम्हाला पुढे जायचे आहे” असे मोइद युसूफ म्हणाले. युसूफ यांच्या विधानावर भारतीय अधिकाऱ्यांनी तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.