काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच हिची तिच्याच भावाकडूनच हत्या करण्यात आली होती. पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुजफ्फराबाद प्रांतात असणाऱ्या ग्रीन टाउन भागात तिची हत्या करण्यात आली होती. कंदीलने मॉडेलिंग क्षेत्र सोडवे यासाठी तिचा भाऊ तिच्यावर दडपण आणत होता. या वादातूनच तिची हत्या झाल्याचे वृत्त समोर आले होते. कंदीलचा भाऊ वासिम याने यापूर्वी अनेकदा कंदीलला तिचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर अपलोड न करण्याबद्दलही बजावले होते.
कंदीलच्या हत्येनंतर या प्रकरणी स्थानिक पोलीस यंत्रणांमार्फत चालवलेल्या तपासादरम्यान या प्रकरणाला आता एक नवे वण मिळाले आहे. पाकिस्तान पोलिसांनी सदर प्रकरणी संशयित म्हणून कंदील बलोचच्या बहिणीलाही अटक केली असल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळाले आहे. शहनाझ आणि हक नवाझ या दोघींनाही कंदील बलोच हत्याप्रकरणी पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. दरम्यान पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या कंदीलच्या भावाच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आणखीन तीन दिवसांची वाढ केली आहे. कंदील बलोच हत्याप्रकरणी पोलीस यंत्रणा शहनाझ आणि हक नवाझ यांचीही आता रितसर चौकशी करणार असून त्यानंतरच या हत्येमागील खरा सुत्रधार समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.