पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या जागतिक संसदीय परिषदेमध्ये काश्मीर प्रश्न पुन्हा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरच्या जनतेचे सार्वमत घ्यावे, अशी मागणीही पाकिस्तानने केली आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे हंगामी अध्यक्ष मूर्तझा जावेद अब्बासी यांनी सांगितले की, या भागातील काही वादांमुळे आर्थिक व सामाजिक क्षमता जास्त असतानाही प्रगतीपासून वंचित रहावे लागत आहे, या वादांमध्ये काश्मीरचा मुद्दा प्रमुख आहे.
काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य करण्यात आलेले आहे व संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांमध्ये त्याचा उल्लेख आहे. काश्मिरी लोकांनी न्यायासाठी व स्वयंनिर्णयाच्या हक्कासाठी बरीच वाट पाहिली पण त्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरमध्ये निष्पक्ष पद्धतीने सार्वमत घ्यावे तरच शाश्वत शांतता व विकास शक्य आहे. शांतता व स्थिरतेशिवाय विकास होऊ शकत नाही, आर्थिक व सामाजिक विकास हा त्या दोन घटकांशी निगडित असतो. पाकिस्तानही दोन दशके दहशतवादाला सामोरा जात आहे. आम्ही दहशतवादाचे निर्मूलन करायचे ठरवले आहे,असे अब्बासी यांनी सांगितले.

संरक्षणासाठी पाकिस्तानी लष्करी दलेही सज्ज
इस्लामाबाद- भारताच्या आक्रमणापासून देशाचे संरक्षण करण्यास आमची लष्करी दलेही सज्ज आहेत, असे प्रत्युत्तर पाकिस्तानने दिले आहे. भारतीय लष्कराने छोटय़ा युद्धांसाठी सज्ज रहावे, असे आवाहन लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांनी केले असतानाच पाकिस्तानने आम्हीही देशाच्या रक्षणास सिद्ध असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने हे प्रत्युत्तर दिल्याचे ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ ने म्हटले आहे. जनरल सुहाग यांनी काल असे सांगितले होते की, पाकिस्तान जम्मू-काश्मीर व इतर भागात अशांतता पसरवण्यासाठी नवीन मार्गाचा अवलंब करीत आहे. त्यामुळे आगामी काळात त्या देशाशी झटपट व छोटय़ा युद्धासाठी सैन्याने तयार रहावे. जनरल सुहाग यांनी दिलेला इशारा फेटाळताना या अधिकाऱ्याने सांगितले की, हा केवळ बोलघेवडेपणा आहे.