भारत सरकारकडून जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून रोज काही ना काही कुरपती करणे सुरू आहे. काल भारताला आण्विक युद्धाचा इशारा देणाऱ्या पाकिस्तानकडून आता भारतासाठी पाकिस्तानची हवाई हद्द पूर्णपणे बंद करण्याचा विचार सुरू आहे.

पाकिस्तान सरकारचे मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारतासाठी पाकिस्तानची हवाई हद्द पूर्णपणे बंद करण्याच्या विचारात आहेत. याबरोबरच अफगाणिस्तान व भारतादरम्यान होणाऱ्या व्यापारासाठी पाकिस्तानमधील मार्गांच्या केल्या जाणाऱ्या वापरांवरही निर्बंध आणले जाण्याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत सूचवण्यात आलेले आहे.

या निर्णयांबाबत पाकिस्तान आता कायदेशीर औपचारिकतांवर विचार करत आहे. नुकतेच फ्रान्स दौऱ्यावर जाऊन आलेले पंतप्रधान मोदी हे भारतात परतताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीजवळूनच आले होते. आता जर पाकिस्तान भारतासाठी हवाई हद्द बंद करत असेल तर त्याला या निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. कारण, या अगोदर बालाकोटमधील भारतीय सेनेकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून संतापाच्या भरात भारतासाठी हवाई हद्द बंद करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना या घेतलेल्या निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागली होती. भारताच्या तुलनेत जवळपास २०० कोटींपेक्षा अधिक आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. एवढा मोठा तोटा सहन करावा लागल्यानंतर पाकिस्तानला अक्कल आली होती व भारतासाठी पुन्हा हवाई हद्द मोकळी करून देण्यात आली होती.