पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेमध्ये मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव अखेर जिंकला आहे. त्यामुळे ते सत्तेवर कायम राहणार असून यामुळे त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्याची प्रतिक्रिया तेहरीक ए इन्साफच्या नेत्यांकडून दिली जात आहे. पाकिस्तानमध्ये सत्तेवर कुठली व्यक्ती असेल, याचे परिणाम भारताच्या देखील परराष्ट्र धोरणावर होत असल्यामुळे भारतासाठी देखील या विश्वासदर्शक ठरावामध्ये नेमकं काय घडतं, हे पाहाणं महत्त्वाचं होतं. हा ठराव जिंकण्यासाठी १७२ मतांची आवश्यकता असताना इम्रान खान यांना १७८ सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यात यश आल्यामुळे त्यांचं सरकार सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

विरोधकांशिवायच झालं मतदान!

या आठवड्याच्या सुरुवातीला पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दुल हफीज शेख सिनेट निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या संसदेत असलेल्या विरोधी पक्ष पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट पक्षाने पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरून विरोधकांनी रान उठवल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:च विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. विश्वासदर्शक मतदानावेळी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटसह एकूण ११ विरोधी पक्षांनी सभात्याग केल्यामुळे विरोधकांशिवायच झालेल्या विश्वासदर्शक मतदानात इम्रान खान विजयी झाल्याचं अध्यक्षांनी घोषित केलं.

पाकिस्तानच्या संसदेचं कनिष्ठ सभागृह अर्थात तिथल्या लोकसभेमध्ये एकूण ३४२ सदस्य आहेत. त्यापैकी इम्रान खान यांच्या सत्ताधारी तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे १५६ सदस्य आहेत. इथर सदस्यांच्या पाठिंब्यावर इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन केलं आहे.