भारतीय नेतृत्वाच्या ‘बेजबाबदार आणि अविवेकी’ वक्तव्यांबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि आपल्या देशाच्या हितसंबंधांचे ‘कुठलीही किंमत देऊन’ संरक्षण करण्याची ग्वाही दिली.
अशाप्रकारच्या वक्तव्यांमुळे वातावरण दूषित होते, तसेच क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्य या उद्दिष्टापासून दोन्ही देशांना दूर नेते, असे शरीफ यांनी पाकिस्तानी राजदूतांच्या परिषदेला संबोधित करताना सांगितले.
भारतीय नेत्यांनी अलीकडे केलेल्या बेजबाबदार आणि अविवेकी वक्तव्यांमुळे संपूर्ण देशात दहशत निर्माण झाली आहे. यामुळे वातावरण बिघडत असल्यामुळे आम्ही देशाचे महत्त्वाचे हितसंबंध कुठलीही किंमत देऊन जपू, असे ते म्हणाले. भारतीय नेत्यांनी हा संदेश लक्षपूर्वक ऐकावा. याच वेळी, कुणी भडकावल्यामुळे आम्ही आमची उच्च नैतिक भूमिका सोडणार नाही. शांततापूर्ण शेजाऱ्यांसाठीचा आमचा शोध आम्ही सुरूच ठेवू, असे शरीफ म्हणाले.