गेल्या आठवडय़ात जम्मू येथील कारागृहात इतर कैद्यांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पाकिस्तानी कैद्याचा गुरुवारी येथील रुग्णालयात मृत्यू झाला. सनाउल्लाह रंजय ५२ असे या कैद्याचे नाव असून इतर कैद्यांनी केलेल्या मारहाणीमुळे तो कोमात गेला होता. दरम्यान, सनाउल्लाहचा मृतदेह पाकिस्तानच्या खास विमानाने लाहोर येथे पाठविण्यात आला.
सनाउल्लाह याचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.  १९९९ साली अटक करण्यात आलेल्या सनाऊल्लाहला टाडाअंतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. भारतीय कैदी सरबजित सिंग याला पाकिस्तानातील कारागृहात कैद्यांनी मारहाण करून जिवे ठार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जम्मू येथील तुरुंगात सनाऊल्लावर इतर कैद्यांनी हल्ला केला होता. जखमी झालेल्या सनाऊल्लाहला तातडीने जम्मूहून येथील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, पाकिस्तानने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर सखोल चौकशीची मागणी केली आहे.