फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे वय निश्चित करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याची मागणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने या आरोपीला फासावर लटकविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोपीच्या वयाच्या मुद्दय़ावरून यापूर्वी चार वेळा फाशी पुढे ढकलण्यात आली होती. सदर आरोपीचे नाव शफाकत हुसेन असे असून एका सात वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याबद्दल हुसेनला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे त्याला फाशी देण्यात येणार होते. मात्र २००४ मध्ये त्याने हत्या केली तेव्हा त्याचे वय काय होते हे निश्चित केले जावे यासाठी हुसेनने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्याने त्याची फाशी चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य न्यायाधीश नसिरूल मुल्क यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठासमोर दोन दिवस सुनावणी झाली. हुसेन यांचे वय निश्चित करण्यासाठी आयोग नियुक्त करावा ही मागणी पीठाने फेटाळली. हुसेन याला दोषी ठरविण्यात आले तेव्हा तो केवळ १४ वर्षे वयाचा होता, असा दावा एका गटाने केला आहे.