अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना पाकिस्तानमध्ये आणण्यात अपयशी ठरल्याबद्दल नवाझ शरीफ सरकारवर टीका करणारे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे राज्यपाल मोहम्मद सरवर यांनी गुरुवारी राजीनामा दिला. दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आलेले ओबामा यांना पाकिस्तानमध्ये न आणू शकणे हे नवाझ शरीफ सरकारचे ‘राजनैतिक अपयश’ होते. ओबामांची दुसऱ्यांदा भारत भेट हे पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहाराच्या आघाडीवरील फार मोठे अपयश आहे. शरीफ यांनी त्यांची पाकिस्तान भेटही आयोजित करायला हवी होती, असे सरवर यांनी ओबामांच्या भारत दौऱ्यानंतर म्हटले होते. सरवर यांच्या टीकेने विचलित झालेल्या शरीफ यांनी स्पष्टीकरण मागवले होते, परंतु त्याऐवजी राज्यपालांनी राजीनामा देण्याचा मार्ग पत्करला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.