काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्राने पाकव्याप्त काश्मीरलाही आपल्या हवामान अंदाजात समाविष्ट करून घेतले. त्यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या ‘वेदर रिपोर्ट’मध्ये भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश केलाय. पण, लदाखच्या तापमानाचा अंदाज वर्तवताना पाकिस्तानची मोठी फजिती झाली आहे. त्यावरुन पाकिस्तानची सोशल मीडियावर चांगलीच टर उडवली जात आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद या प्रदेशांतील हवामानाचा अंदाज देणे भारतीय हवामान खात्याने सुरू केले आहे. जम्मू-काश्मीर हवामान विज्ञान उपविभागानुसार ५ मेपासून या भागांचा अंदाज दिला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी रेडिओवर रविवारी जम्मू-काश्मीरचे हवामानाचे अंदाज दिले. ट्विटरद्वारेही त्यांनी हवामानाची माहिती दिली. पण लदाखच्या हवामानाची माहिती देताना मात्र, त्यांनी मोठी चूक केली.

पाकिस्तानी रेडिओने ट्विटमध्ये लदाखचे कमाल तापमान -४ डिग्री आणि किमान तापमान -१ डिग्री असल्याचे सांगितले आणि इथेच त्यांनी घोळ केला. त्यावर लगेचच अनेक नेटकऱ्यांनी, ‘कमाल तापमान -१ डिग्री आणि किमान तापमान -४ डिग्री असे दाखवायला हवे होते’, असे सांगत पाकिस्तानची चूक चव्हाट्यावर आणली.


आता पाकिस्तानला सोशल मीडियावर नेटकरी मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत.