आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेले पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताचं नाव न घेता पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. “आता केवळ अण्विक युद्ध होईल, परंपरागत पद्धतीनं युद्ध केलं जाणार नाही,” अशी पोकळ धमकी रशीद यांनी दिली. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही धमकी दिली. दोन दिवसांपूर्वीच भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या पायाखालची जमिन पुन्हा एकदा सरकल्याचं दिसत आहे.

“आता ४-६ दिवस टँक, तोफा चालतील असं युद्ध केलं जाणार नाही, आता केवळ अण्विक युद्ध होईल,” असं रशीद यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. “यापूर्वी मी १२६ दिवस आंदोलनात सहभागी होतो. त्यावेळी देशातील परिस्थिती वेगळी होती. आता एअर टँकनं हल्ला किंवा नौदलाकडून हल्ला केला जाणार नाही. आता केवळ अण्विक युद्ध होईल आणि ज्याप्रकारची गरज असेल त्या प्रकारे अण्विक हल्ला केला जाईल,” असंही ते म्हणाले.

यापूर्वीही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेल्या धमकीनंतर शेख रशीद यांनी भारताला अण्विक हल्ल्याची धमकी दिली होती. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला होता. “इम्रान खान यांनी स्पष्ट संदेश दिला आहे. जर कोणी पाकिस्तानकडे डोळे वटारुन पाहिलं तर त्याचे डोळे बाहेर काढू. यानंतर ना चिमण्यांचा चिवचिवाट होईल, ना मंदिरातील घंटा वाजतील. आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. आमच्यासाठी पाकिस्तानच जीवन आणि पाकिस्तानच मृत्यू आहे,” असं त्यांनी त्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.

दहशतवादी तळांवर भारताची कारवाई
भारतीय लष्करानं रविवारी पाकव्याप्त काश्मीरमधील निलम खोऱ्यात चार दहशतवादी तळ आणि पाकिस्तानी सैन्याच्या ठिकाणांवर कारवाई केली होती. सैन्याच्या या कारवाईत पाकिस्तानचे १० जवान आणि तेवढ्याच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. पाकिस्तानी रेंजर्सनं रविवारी सकाळी तंगधर सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. त्या गोळीबारा भारताच्या दोन जवानांना वीरमरण आलं होतं, तर एका नागरिकाचाही गोळी लागल्यानं मृत्यू झाला होता. यानंतर भारतानं चोख प्रत्युत्तर देत पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई केली होती.

मोदींचं नाव घेताच बसला होता करंट
पाकिस्तान काश्मिरी जनतेसोबत आहे हे दाखवण्यासाठी पाकिस्तानमध्ये ‘काश्मीर अवर्स’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानी जनतेला रस्त्यावर उतरुन काश्मीरबाबत आपली एकजुटता दाखवण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी रशीद हे माईक हातात घेऊन जनतेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मोदींचे नाव घेताच त्यांना करंट लागला. त्यामुळे ते क्षणभर गोंधळले, या घटनेचे पाकिस्तानी माध्यमांच्या कॅमेरॅमध्ये चित्रीकरण झाले. “आम्ही तुमच्या मोदी धोरणांना जाणून आहोत,” असं म्हणताच त्यांच्या हातातल्या माईकमधून त्यांना वीजेचा झटका बसला आणि ते क्षणभर गोंधळून गेले. त्यानंतर ते पुन्हा म्हणले की, “मला वाटतं माईकमधून करंट आला असेल मात्र, मोदी हा विरोध मोडून काढू शकत नाहीत.”