आपल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून कायम चर्चेत राहत असलेल्या पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा एकदा भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी देत पाकिस्तानकडे असलेला अणूबॉम्बची पोहोच आसामपर्यंत असल्याचं म्हटलं. तसंच या अणुहल्ल्याचा मुस्लिमांना कोणतंही नुकसान होणार नसल्याचंही ते म्हणाले.
“जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर ते अखेरचं युद्ध असेल,” अशी धमकीही रशिद यांनी दिली. “जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर पारंपरिक युद्ध होणार नाही. आमच्याकडील शस्त्रं हे मुस्लिमांचा जीव वाचवून थेट आसामपर्यंतच्या प्रदेशावर हल्ला करु शकतात,” असा अजब दावा रशीद यांनी केला आहे. पाकिस्तानातील पत्रकार नायला इनायत यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
शेख रशीद यांनी यापूर्वीही भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली होती. त्यांनी भारताचं नाव न घेतो भारताला धमकी दिली होती. “आता जर युद्ध झालं तर ते पारंपरिक पद्धतीनं होणारं युद्ध नसेल. परंतु ते अण्विक युद्ध असेल,” असं रशीद एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते. “आता चार-सहा दिवस टँक, तोफा चालणार नाहीत. तर आता थेट अण्विक युद्ध होईल,” असंही त्यांनी नमूद केलं होतं. “पाकिस्तानकडे अशी अणूबॉम्ब आहेत जे आपलं अचूक लक्ष्य साधू शकतात. पाकिस्तानकडे असलेले अणूबॉम्ब हे ठराविक प्रदेशाला लक्ष्यही करू शकते हे भारतानं ऐकावं,” असंही रशीद म्हणाले.
राम मंदिराबाबतही यापूर्वी वक्तव्य
शेख रशीद यांनी नुकत्याच पार पडलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबतही वक्तव्य केलं. भारत हा आता धर्मनिरपेक्ष देश राहिला नाही. तर एका धर्माचा देश बनला असल्याचा ते म्हणाले होते. त्यांच्या य़ा वक्तव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना कठोर शब्दात उत्तर दिलं होतं. “जो देश दहशतवाद पसरवतो तो अशा प्रकारचा धार्मिक द्वेश वाढवण्यासारखी वक्तव्यही करू शकतो,” असं भारतानं म्हटलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2020 8:43 am