16 September 2019

News Flash

VIDEO: भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्याला लाथा-बुक्यांनी मारहाण

मारहाण करण्याबरोबरच हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंडीही फेकली

पाकिस्तानी नेत्याला मारहाण

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारत सरकारने रद्द केल्यानंतर भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याला लंडनमध्ये मारहाण करण्यात आल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींने लाथा-बुक्यांनी मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अवामी मुसलीम लीगचे प्रमुख आणि पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांच्यावर एका पुरस्कार सोहळ्यामध्ये हल्ला झाला. शेख हे पुरस्कार सोहळ्यासाठी एका बड्या हॉटेलमध्ये पोहचले होते. सोहळ्याच्या दरम्यान शेख धुम्रपानासाठी बाहेर आले असता अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीशी (पीपीपी) संबंधीत नेत्यांनी घेतली आहे. पीपीपीशी संलग्न असलेल्या पीपल्स यूथ ऑर्गनायझेशन युरोप या गटाचा अध्यक्ष असणाऱ्या आसिफ अली खान आणि पक्षाच्या महिला शाखेच्या समा नमाज यांनी शेख यांच्यावर आम्हीच हल्ला केल्याचे म्हटले आहे.

शेख यांनी काही दिवसांपूर्वी पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांच्याबद्दल बोलताना अपशब्द वापरले होते. शेख यांच्या या वक्तव्यावर पीपीपीचे कार्यकर्ते आणि महिला नाराज होत्या. त्यांनी आपला राग शेख यांना मारहाण करुन व्यक्त केला. मात्र आम्ही शेख यांच्यावर केवळ अंडी फेकल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील महिला पत्रकार नायला इनायत यांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ ट्विटवरुन पोस्ट केला आहे.

शेख हे अनेक मुलाखतींमध्ये बिलावल यांच्याबद्दल अपशब्द वापरतात. नुकतेच त्यांनी बिलावल यांच्याबद्दल ज्या पद्धतीचे शब्द वापरले होते त्यानंतरही आम्ही केवळ अंडी फेकून विरोध केल्याबद्दल शेख यांनी आमचे आभारच मानले पहिजे. असे मत खान यांनी व्यक्त केले. अवामी मुसलीम लीगकडे अद्याप या घटनेचा कोणताही व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. लवकरच या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.

First Published on August 23, 2019 8:51 am

Web Title: pakistan railways minister sheikh rashid attacked in london scsg 91