पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नाचे तुणतुणे वाजवले असून ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी)ही संघटना तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने त्यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
प्रादेशिक संस्था व समकालीन जागतिक सुरक्षा आव्हाने या विषयावरील मुक्त चर्चासत्रात पाकिस्तानच्या स्थायी दूत मलिहा लोधी यांनी सांगितले, की ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या संघटनेने जागतिक शांतता व प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने पॅलेस्टाइन, मध्यपूर्व व जम्मू-काश्मीरसारख्या समस्या हाताळण्याची क्षमता या संघटनेत आहे. संयुक्त राष्ट्रांनीही ओआयसीला सहकार्य करावे व जगात शांतता निर्माण करावी. विस्थापित शरणार्थीना मदत करावी. प्रत्येक संघर्षांच्या मूळ कारणांचा विचार करावा. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी भारत व पाकिस्तान यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जो तणाव सुरू आहे, त्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून भारत-पाकिस्तान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या चर्चेत सकारात्मक फलश्रुती असेल, अशी आशा व्यक्त केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल व पाकिस्तानचे समपदस्थ सरताज अझीज यांच्यात २३ ऑगस्टला चर्चा होत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ यांच्या रशियातील उफा येथे झालेल्या बैठकीत दोन्ही देशांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चा करण्याचे मान्य करण्यात आले होते.