भारत-पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर होणाऱ्या चर्चेपूर्वीच काश्मीर प्रश्न आम्ही सोडून दिलेला नाही. तेथील लोकांचा स्वातंत्र्य लढा न्याय्य आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे. गेली अनेक दशके रेंगाळलेला काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय दोन्ही देशातील संबंध सुरळीत व सहकार्याचे होणार नाहीत, असे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या ज्या आशाआकांक्षा आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही व काश्मीर प्रश्न मागेही ठेवून चालणार नाही, काश्मीरसाठीचा लढा सुरूच राहील, असे ते म्हणाले.
पाकिस्तानला भारताबरोबर सहकार्याचे व सुरळीत संबंध हवे आहेत हे खरे असले, तरी त्यासाठी जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर २३ ऑगस्टला भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान चर्चा होणार असून त्यात दहशतवादाचा मुद्दाही असणार आहे. रशियात उफा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पावसाच्या सरी येत असताना बसित यांनी चानसेरी येथे पाकिस्तानचा ध्वज फडकावला, त्यांनी सांगितले, की पाकिस्तानचा लढा दहशतवादाशी आहे, आर्थिक आघाडीवर पाकिस्तानला अनेक आव्हाने आहेत पण आमची अर्थव्यवस्था ऊर्जितावस्थेत आल्याची चांगली लक्षणे दिसत आहेत.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी सांगितले, की २३ ऑगस्टला आपण भारतात चर्चेसाठी जात आहोत.
आताच्या चर्चेत भारत पाकिस्तानला दहशतवादाबाबत पुरावे देण्याच्या तयारीतच आहे कारण पंजाबमधील गुरुदासपूर व काश्मीरमधील उधमपूर येथे करण्यात आलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानचा नावेद याकूब हा अतिरेकी उधमपूर येथील हल्ल्यात पकडला गेला आहे.
भारतीय उच्चायुक्त राघवन यांची अझीझ यांच्याशी चर्चा
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त टीसीए राघवन यांनी भारत-पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा संस्था यांच्यातील दहशतवादाशी संबंधित चर्चेच्या पहिल्या फेरीच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे सल्लागार सरताज अझीझ यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीनंतर अझीझ यांनी भारतीय राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे सल्लागार अजित दोव्हाल यांच्याशी चर्चा करण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी भारतात जाणार असल्याचे सांगितले. पाकिस्तानमधील भारतीय दूतावासाने राघवन यांनी अझिझ यांच्याशी चर्चा केल्याचे म्हटले आहे. २३-२४ ऑगस्ट रोजी भारतात होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या चर्चेत अझीझ पाकिस्तान प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करतील, अशी माहिती राघवन यांनी अझीझ यांना दिल्याचे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले.