पाकिस्तानने बुधवारी ५८ शीख भाविकांना व्हिसा देण्यास नकार दर्शवला आहे. महाराजा रणजित सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त या भाविकांना दर्शनासाठी पाकिस्तानला जायचे होते. शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीने व्हिसासाठी २८२ अर्ज पाठवले होते त्यापैकी केवळ २२४ जणांना व्हिसा देण्यात आला. तर ५८ जणांचा व्हिसा नाकारण्यात आला.

यासंदर्भात एसजीपीसी सचिव मंजीत सिंह यांनी सांगितले की, आम्ही २८२ शीख भाविकांच्या व्हिसासाठी अर्ज केला होता मात्र केवळ २२४ जणांना व्हिसा देण्यात आला. तर उर्वरीत ५८ जणांचा व्हिसा नाकारण्यात आला. हे शीख भाविक उद्या अट्टारी रेल्वे स्टेशनहून एका विशेष रेल्वेने पाकिस्तानला जातील.

ज्या भाविकांना व्हिसा नाकारण्यात आला त्यांनी एसजीपीसी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. त्यांनी म्हटले की, ही व्हिसा पद्धतच बंद करायला हवी अशी आमची मागणी आहे. भाविकांना याच्याशिवाय यात्रेस जाण्याची परवानगी असावी, आता आम्ही पाकिस्तानच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत. धार्मिक स्थळांची यात्रा करण्यासाठी भारत- पाकिस्तान दरम्यान प्रोटोकॉल १९७४ नुसार परवानगी देण्यात आली आहे. या करारानुसार भारतातून हजारो भाविक दरवर्षी धार्मिक उत्सव व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात.