पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना रमझानच्या शुभेच्छा दिल्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी ११३ भारतीय मच्छीमारांची सुटका केली.
रमझानच्या पवित्र महिन्याला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे त्यामुळे सद्भावनेच्या दृष्टिकोनातून मालिर कारागृहातून भारतीय मच्छीमारांची सुटका करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत, असे कारागृह उपअधीक्षक मोहम्मद हुसेन सेहतो यांनी सांगितले.
काराकोरम एक्स्प्रेसने ११३ भारतीय मच्छीमार लाहोरला येणार असून त्यांना शुक्रवारी वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले जाणार आहे. रमझानच्या पवित्र महिन्याचे औचित्य साधून भारतही पाकिस्तानच्या मच्छीमारांची सुटका करणार असल्याचे मोदी यांनी शरीफ यांना दूरध्वनीवरून सांगितले होते.
वाघाच्या चार बछडय़ांचे जयललितांकडून नामकरण
चेन्नई- येथील प्राणीसंग्रहालयात अलीकडेच जन्मलेल्या पांढऱ्या वाघांच्या चार बछडय़ांचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी नामकरण केले. सदर चारही बछडे मादी असून त्यांचे नामकरण अनिता, प्रीता, सुनीता आणि संगीता असे करण्यात आले आहे.
आकांक्षा नावाच्या पांढऱ्या वाघिणीने शेजारच्या कांजीपुरम जिल्ह्य़ातील वंडलूर येथील अरिगनार अण्णा प्राणीसंग्रहालयात चार बछडय़ांना जन्म दिला, असे सरकारने जाहीर केले.
जयललिता यांना प्राण्यांबद्दल विशेष प्रेम आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी या प्राणीसंग्रहालयात जाऊन तेथील सुविधांची पाहणी केली होती आणि त्या वेळी वाघाच्या सात बछडय़ांचे नामकरणही केले होते.