जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या जत्थ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडण्यात आले असून त्यांची आर्थिक कोंडी करण्यात आली आहे. यामुळे हडबडलेल्या पाकिस्तानने आता थेट संयुक्त राष्ट्रांमध्ये धाव घेतली आहे. तसेच पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून निर्माण केलेल्या तणावाची परिस्थिती निवळण्यास तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.


पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंतोनियो गुतरेस यांना सोमवारी एक पत्र लिहून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मदत मागितली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव वाढला असून दोन्ही देशांनी आपापल्या उच्चायुक्तांनाही परत बोलावून घेतले आहे.

कुरेशी यांनी म्हटले की, मी भारताकडून पाकिस्तानविरोधात होणाऱ्या संभाव्य कारवाईमुळे आमच्या क्षेत्रात बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीकडे आपले ध्यान वेधून घेऊ इच्छितो. भारताने काश्मीरप्रश्नी कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला नाकारले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांशी जोडलेल्या सर्व प्रश्नांना द्विपक्षीत पद्धतीने सोडवायला हवेत असा भारताचा नारा आहे.

पुलवामात भारतीय सीआरपीएफच्या जवानांवरील हल्ला स्पष्टपणे एका काश्मीरी रहिवासी तरुणाने केला आहे. भारतानेही ते मान्य केले आहे. त्यामुळे चौकशीपूर्वीच या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरणे चुकीचे आहे. भारताने आपल्या अंतर्गत राजकीय कारणांसाठी पाकिस्तानविरोधात जाणीवरपूर्वक विधाने केली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण केले आहे.

त्याचबरोबर भारताने सिंधू नदीच्या पाणी करारातूनही बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, भारताची ही एक मोठी चूक असेल असेही त्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पावले उचलणे अनिवार्य आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करून भारताला या दहशतवादी हल्ल्याची मुक्त आणि विश्वासपूर्व चौकशी करण्यास सांगायला हवे, असेही कुरेशी यांनी म्हटले आहे. तसेच हे पत्र सुरक्षा परिषद आणि महासभेकडे पाठवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.