भारत सरकारकडून कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढण्यात आल्यानंतर पाकिस्तान चवताळलेला आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांकडे नेला खरा, मात्र त्या ठिकाणी या दोन्ही देशांच्या मनसुब्यांना यश आले नाही. यानंतर शनिवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शनिवारी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती, या बैठकीत काश्मीर संदर्भात अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले की, काश्मीरबाबत विशेष समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात काश्मीर सेलची निर्मिती केली जाईल. याशिवाय जगभरातील पाकिस्तानी दूतावासांमध्ये काश्मीर डेस्क तयार केला जाईल, ज्यामुळे या प्रकरणी प्रभावीपणे तोडगा काढता येईल. तसेच, आम्ही याप्रश्नी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याबाबत देखील चर्चा केली असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी भारताला तोंड देण्यासाठी पाकिस्तान सीमेवर सज्ज असल्याचेही सांगण्यात आले.

यावेळी कुरैशी म्हणाले की, भारताकडून फ्लॅग ऑपरेशन केले जाण्याची शक्यता आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायास विश्वासात घेऊ इच्छित आहोत व त्यांना आमच्या शंकेबाबत सांगू इच्छित आहोत. तसेच आम्हाला आंतरराष्ट्रीय समुदायाला याबाबत देखील सांगायचे आहे की, आम्हाला त्यांच्या (भारताच्या) वागणूकीबाबत शंका आहे व त्यांचे हेतू आम्हाला माहिती आहे. त्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे. आम्हाला आमचे प्रयत्न वाढवावे लागतील.

पाकिस्तान आर्मीचे प्रवक्ता म्हणाले की, सद्यस्थितीस काश्मीरचे रूपांतर तुरुंगात झाले आहे. आर्टिफिशियल कवर हटवण्यात आल्यानंतर जेव्हा काश्मीर खोऱ्यात मुक्तता दिली जाईल, तेव्हा त्या ठिकाणी हिंसा वाढेल. भारताचे म्हणने आहे की त्या ठिकाणी घुसखोर आहेत मात्र ते याचा वापर फ्लॅग ऑपरेशनसाठी करू शकतात. मी आपल्याला विश्वास देतो की जर भारतीय सेनेकडून काही हालचाल केल्या गेली तर त्यांना उत्तर मिळेल, आम्ही देखील सीमेवर सज्ज आहोत.