रशियातील उफा येथे झालेल्या भेटीदरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू करण्यावर नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यात मतैक्य झाले असतानाच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या मुद्दय़ावरून दोन्ही देशांत वाक्युद्ध सुरू झाले आहे. सीमारेषेवर गोळीबार, बॉम्बफेक करून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताने जशास तसे उत्तर देण्याचा इशारा गुरुवारी दिला. तर पाकिस्तानने भारतावरच शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला. या पाश्र्वभूमीवर उभय देशांत परराष्ट्र सचिव पातळीवर नजीकच्या काळात होणाऱ्या चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, जम्मूच्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानने गेल्या दोन दिवसांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक भारतीय हद्दीत जोरदार गोळीबार व बॉम्बफेक सुरू केली आहे. बुधवारी त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर सीमा सुरक्षा दलाचा जवान जखमी झाला. त्यातच भारताचे हेरगिरी ड्रोन पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला. या सर्व पाश्र्वभूमीवर गुरुवारी दोन्ही देशांमध्ये वाक्युद्ध रंगले. पाकिस्तानने भारताचे उच्चायुक्त टीसीए राघवन यांना पाचारण करून जाब विचारला तर भारतानेही पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना खडे बोल सुनावले. यादरम्यान संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली. तीत पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याचे ठरले. मात्र, त्याचवेळी सीमारेषेवर शांतता राखण्यास भारत कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही भारतातर्फे करण्यात आला.

पाकिस्तानने भारताचे हेरगिरी ड्रोन पाडल्याचा दावा केला असला तरी तो धादांत खोटा असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानी हद्दीत सापडलेले ड्रोन चिनी बनावटीचे असून ते भारताचे नसल्याचे भारतीय लष्कर आणि हवाई दल यांनी म्हटले आहे.

या तणावाच्या पाश्र्वभूमीवर मोदी-शरीफ भेटीत ठरल्याप्रमाणे नजीकच्या काळात भारत-पाकिस्तानात परराष्ट्र सचिव पातळीवर द्विपक्षीय चर्चा होईल का, या प्रश्नाला थेट उत्तर देण्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी टाळले. भविष्यकथन करण्यास आपण असमर्थ असल्याचे ते म्हणाले.