पाकिस्तानमध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधन यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना दुसरा कॉन्सुलर अॅक्सेस देण्याचा प्रस्तावही दिल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.

१७ जून रोजी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानचे अतिरिक्त अॅटर्नी जनरल यांनी त्यांच्या शिक्षेच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल करण्यास सांगितलं होतं. परंतु आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करत त्यांनी आपल्या शिक्षेवर फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्ताननं त्यांना दुसरा कॉन्सुलर अॅक्सेस देण्याचा प्रस्तावही दिल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचे वडील आणि त्यांच्या पत्नी यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून कुलभूषण जाधव हे पाकिस्तानमधील तुरूंगात आहेत. तथाकथित हेरगिरी आणि दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांवरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात भारताने थेट नेदरलँडमधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. “जाधव यांच्या प्रकरणाचा आणि दिलेल्या शिक्षेचा आढावा घेऊन फेरविचार करण्यात यावा. तसेच विलंब न करता त्यांना भारतीय दूतावासाची मदत देण्यात यावी”, असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले होते. ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानमधून पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं त्यांना अटक केल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे जाधव यांचं इराणमधूनच अपहरण केल्याचा दावा भारतानं केला होता.